Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > "कोरोनामुळे शहरातून परतलेल्यांच्या हाती आले डवरे व खुरपे."

"कोरोनामुळे शहरातून परतलेल्यांच्या हाती आले डवरे व खुरपे."

कोरोनामुळे शहरातून परतलेल्यांच्या हाती आले डवरे व खुरपे.
X

'लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद व कामे उपलब्ध नसल्याने परतलेल्याच्या नशिबी शेतीची कामे.'

त-हाडी :- जवळपास साडेतीन ते चार महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना संक्रमणाच्या भीतीने सरकारला लॉकडाऊन वाढविण्याशिवाय पर्याय राहिला नाही.त्यामुळे साहजिकच शहरी भागातील कंपन्या व कामे स्थगित करावे लागल्याने ग्रामीण भागातील रोजगारासाठी गेलेल्या कामगारांना शहरातून आपआपल्या घरी परतावे लागले आहे.थंड एसीत काम करणाऱ्यासोबतच दिवसभर उन्हातान्हात आपल्या पोटाची खडगी भरणाऱ्यांना ही घराचा मार्ग धरावा लागल्याने एकमेव रोजगाराचे साधन असलेल्या शेतीने या सर्वानाच सद्या तारले असून आजरोजी खरिप हंगामाच्या लगीनघाईत जवळपास शहरातून परतलेल्या अनेकांच्या हाती सद्या खुरपे तर डवरे आल्याचे पहावयास मिळत आहे.यामुळे अपघाताने का होईना शेतीला रोजगार उपलब्ध झाल्याने शेतीला अच्छे दिन आले आहेत.

म्हणतात ना 'वावर हाय तं पावर हाय 'खरंच शेती व्यवसाय हा तोट्यात चालत असल्याने जवळ थोडीफार शेती घरी असूनही उत्पन्नाची किनार लाभत नसल्याने काहींनी यापेक्षा रोजगार बरा म्हणून शहरी भागात व्यवसाय थाटला आहे.तर काही शेतमजुरांनी मोठ्या प्रमाणात अंगमेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतीतील कामापेक्षा शहरातील मिळेल त्या कामासाठी शहराकडे धाव घेतल्याने शेतीला मजुरांची वानवा झाल्याचे चित्र यापूर्वी ग्रामीण भागात पहायला मिळाले आहे.एवढेच काय शेतकऱ्यांनीही आपले आयुष्य तर शेतीत गेले मुलांवर तरी ही वेळ येऊ नये यासाठी त्यांना दोन पुस्तके शिकवून शहराकडे जाण्याचा कानमंत्र दिला.परंतु यावर्षीच्या मार्च महिन्यात खऱ्याअर्थी महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याने संक्रमणाच्या भीतीने शहरातील सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने जवळपास ग्रामीण भागातील सर्वानाच परतीचा मार्ग पकडून 'गड्या आपुला गावचं बरा 'युक्तीतून शेतीला हातभार लावण्यातच त्यांनी सद्या धन्यता मानली आहे.सद्या खरीप हंगाम सुरू असून शासन लॉकडाऊन थांबविण्याचा मनस्थितीत नसल्याने व शहरातही कोरोनाचे संक्रमण वाढतच चालल्याने शेतीकामाची पक्की खूणगाठ बांधणाऱ्या शहरी भागातील परतलेल्यांचा वावर सद्या शेतात राबता झाला असून काहींनी हातात खुरपे घेऊन निंदणीला तर काही डवरणीसाठी योध्दा बनत असल्याचे चित्र प्रत्येक गावात पहावयास मिळत आहे.

"शेतीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.गावानेच शेवटी शान राखली."

गेल्या एक दोन दशकात मोठ्या प्रमाणात शहरांकडे मजुरांचे व पर्यायी नोकरदारांचेही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने अनेक गावे ओस पडण्याच्या मार्गावर होती.शेतीलाही मजूर मिळेनासे झाल्याने जास्त शेती असणाऱ्यांनी शेवटी यांत्रिकीरणातून शेतीला पर्याय शोधला होता.परंतु यावर्षी एका कोरोना विषाणूने सर्वानाच घरचा रस्ता दाखविल्याने 'गड्या आपुला गावचं बरा 'ची अनुभूती अनेकांना आली आहे.शेवटी गावानेच कुशीत घेऊन अनेकांना रोजगारही देत आपली शान वाढवली एवढे मात्र नक्की.

----०------०-------०------०---

Updated : 1 July 2020 9:18 PM GMT
Next Story
Share it
Top