Home > महाराष्ट्र राज्य > कोराना काळातील शिक्षण

कोराना काळातील शिक्षण

कोराना काळातील शिक्षण
X

मुले म्हणजे देवाघरची फुले हे वचन फार जुने. दोन्हीचं नातं प्रसन्नतेशी . शाळेतील मुलांना फुलांची साथ मिळाली तर शाळेची प्रसन्नता ही द्विगुणित न झाल्यास नवलच . परंतु हीच मुलं आज कोरोना च्या भितीने घरामध्ये गुपचुप दडलेली आढळतात. त्यांच्या भाव-भावना, मनातील कल्पना इतरांना सांगण्यास आसुसलेली आहेत.आपले विचार प्रकट करण्यापासून आज काही अंशी भीतीयुक्त वातावरणामध्ये वावरत आहेत . मूले सर्वात जास्त शाळेमध्ये आनंदी असतात. पण शाळा बंद ,मित्र-मैत्रिणी भेटणे बंद असल्याने हीच हसणारी मुलं आज कोमजल्या सारखी वाटतात.

विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल घडून येण्यासाठी शाळेविषयीचा दृष्टिकोन बदलणे हे फार मोठे परिवर्तन असते. शिक्षकांचा , शिक्षण व अध्यापन विषयीचा दृष्टीकोन बदलून त्यांच्यामध्ये ज्ञानरचनावादाची पेरणी करण्याचे मोलाचे काम त्यांच्यासाठी शाळेच्या व शिक्षकांच्या माध्यमातून केले जाते .आज कोरोना विषाणूचा ( कोविंड 19) चा प्रसार संपूर्ण जगात झालेला आहे ,अशा परिस्थितीत सर्व क्षेत्रात दक्षता घेण्याची फार आवश्यकता निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत रेड झोन ,ग्रीन झोन करण्यात आले . रेड झोन मध्ये समाजावर अनेक बंधने घातली गेली .परिणामी संपूर्ण मानवी जीवन अस्ताव्यस्त झाले. हवाई उड्डाणे रद्द झाली,सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था कोलमडली .कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक विभागातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व सुजाण नागरिक आपापल्या परीने जमेल तसे महामारी च्या लढ्यामध्ये सक्रिय झाले. समाजाला खरचं गरज असताना नागरिकांनीही ही शासनाच्या आदेशांचे नियम पाळले. शैक्षणिक वर्ष 2020 /21 सुरू झाले आहे .अशा परिस्थितीत शाळा कशा उघडाव्यात ? यासंदर्भात शासनस्तरावरून अनेक प्रकारची परिपत्रके ,शासन निर्णय निघाले व त्यांची अंमलबजावणी सुरू आहे .१५ जून २०२० पासून शाळा सुरू होतील असे प्रत्येकालाच वाटले होते पण कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ऑगस्ट 2020 अखेरपर्यंत शाळा सुरू होऊ शकत नाही हे वास्तव आहे. शाळा सुरू करण्यासाठी शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सभा वारंवार घेण्यात आल्या .परंतु प्रत्येक सभेत सदस्यांनी शाळा सुरू करू नयेत, जोपर्यंत या महामारीवर ठोस रामबाण उपाय किंवा लस सापडत नाही, असाच सूर दिसून आला .ते एका अर्थाने बरोबरच आहे .सन२०२०/२१हे शैक्षणिक वर्ष अध्ययन अध्यापन विरहीत असेच जाते काय ?असा प्रश्न शिक्षक,पालक व शासना समोर ही आ वासून उभा राहिला.

या परिस्थितीत समस्येवर काय उपाय योजना करता येईल का ? हा विचार सर्व स्तरावर होऊ लागला म्हणूनच मा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री यांनी प्रसार माध्यमांतून अनेक वेळा यासंदर्भातील निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व आवश्यकतेनुसार कर्मचारी उपस्थिती बाबत ही शासन निर्णय पारित करण्यात आला . शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सूचना देण्यात आल्या व कार्यवाही करण्यात आली .15 जून 2020 ला सर्व विद्यार्थ्यांना घरपोच शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला .सर्व शिक्षकांनी ही जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडली . शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप केले. शासनामार्फत पुस्तके तर मिळाली पण प्रत्यक्ष अध्यापनाचे काय ? किती मुले घरी अभ्यास करतील ?किती मुले घरी स्वयंअध्ययन करतील? किती मुलांच्या घरी टीव्ही आहेत? किती मुलांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल आहेत?याची खातरजमा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केली असता असे लक्षात आले की फक्त १०% विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच या सुविधा आहेत असे दिसून आले . मग अशा परिस्थितीत करायचे काय ? यावर उपाययोजना म्हणून ज्या विद्यार्थ्यांकडे टीव्ही आहे मोबाईल आहे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण चालू केले परंतु ज्या मुलांकडे कुठलीही व्यवस्था नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन कार्डद्वारे शिक्षण सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना काही अडचणी आल्यास त्याचे काय ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षकांनी आवश्यक ते मार्गदर्शन केले. मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे अतिशय गरजेचे आहे हे जाणून शासनस्तरावरून ही सह्याद्री वाहिनीवर मुलांसाठी टिली मिली हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. आम्ही शिक्षकांनी यासंदर्भात आपल्या विद्यार्थ्यांना या संदर्भातील मार्गदर्शन केले व वेळापत्रक ही त्यांच्यापर्यंत पोहोचले. हा कार्यक्रम बघितल्यावर मुलांना निश्चितच आनंद झाला मुलांना हा कार्यक्रम आवडू लागला .परंतु इथे प्रश्न पडतो की खेडेगावांमध्ये १०% पालकांकडे फक्त टेलिव्हिजन असल्याकारणाने हा कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थी पाहू शकत नाही .ज्यांच्याकडे टीव्ही आहेत ते विद्यार्थी याचा आस्वाद घेऊ लागले परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय ? मग आम्ही त्यावर विचार मंथन करून इयत्तावार विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केले व त्या ग्रुपवर वेगवेगळ्या शैक्षणिक व्हिडीओ इयत्तावार ग्रुप वर टाकण्याचे काम सुरू झाले . हा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरला.

कारण इथे परत प्रश्न निर्माण झाला की प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही ? अशा परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे सुरु राहील यासाठी गल्ली मित्र ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचे मी व माझे सहकारी यांनी ठरवले .काय आहे ही संकल्पना ? मुले ज्या वाडी-वस्तीवर राहतात तिथे एका मित्राचा फोन नंबर घ्यायचा व त्यावर मेसेज किंवा शैक्षणिक व्हिडिओ टाकायचा व त्या मित्राला फोन करून काही समस्या असेल तर मेसेज करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आणि अशाप्रकारे 100% विद्यार्थ्यांकडे हा संदेश जाऊ लागला शैक्षणिक व्हिडिओ पाहणे विद्यार्थ्यांना शक्य झाले. शिक्षकांनी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांना पाहचाविणे किंवा त्यानुसार कार्यवाही करणे सोपे झाले. गल्ली मित्र दिलेला अभ्यास त्या विद्यार्थ्यांपर्यंत सोशल डिस्टंसिंग चे पालन करून आवर्जून पोहोचवतात. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी ठरला परंतु विद्यार्थ्यांच्या सरावाचं काय? किती विद्यार्थ्यांना संकल्पना समजल्या किंवा नाही हे समजण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी आठवड्यातून दोन वेळा जाण्याचे निश्चित केले. व प्रत्येक विद्यार्थ्याला झालेल्या घटकावर आधारित पीडीएफ ( pdf) पाठवायची व ती त्याने दिलेल्या वेळेमध्ये सोडवायची व ज्यावेळेस दुसऱ्यांदा शिक्षक येतील त्यावेळी त्यांच्याकडे जमा करायची व नवीन पीडीएफ पुन्हा घ्यायची असा उपक्रम सुरू केला. त्यातून विद्यार्थी पाठ्यपुस्तकांचे वाचन करून दिलेला स्वाध्याय दिलेले , प्रश्नोत्तरे सोडू लागले .आलेल्या समस्या विद्यार्थी त्या पीडीएफ च्या पाठीमागे लिहून ठेवू लागले जेणेकरून कोणती संकल्पना कोणाला समजली की नाही हे आम्हाला समजू लागले आणि त्यांना त्या विषयाचं मार्गदर्शन करणं सहज शक्य होवू लागले प्रत्येक आठवड्याला आवश्यक ती पीडीएफ विद्यार्थ्यांच्या हाती मिळू लागल्याने शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे ही संकल्पना यशस्वी राबविण्यात आम्हाला यश आले .आठवड्यातून विद्यार्थी व शिक्षक यांचा समोरासमोर संवाद होवू लागला.त्यामुळे आलेली मरगळ विद्यार्थ्यांनी झटकून शिक्षणाच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यात निश्चितच शिक्षकांनाही समाधान लाभले आणि हा उपक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळा पाली येथे यशस्वी झालेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे.

कोणतीही गोष्ट एका झटक्यात बदलत नाही परिवर्तनाचे स्वप्न पाहायचे असेल तर आधी नियोजनाची कास धरावी लागेल.सर्वांमध्ये उत्सवाचे बीजारोपण करावे लागेल आणि या पुढील येणार्या आव्हानांना हसतमुखाने सामोरे जाऊन शैक्षणिक विकास साधणे गरजेचे आहे .यासाठी शिक्षक ,पालक व समाज आणि प्रशासन यांची सांगड घालून यावर योग्य ती उपाययोजना करावी लागेल.

श्री उमेश माधव खिराडे ,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक ,जि.प. शाळा पाली केंद्र पोशेरी ता वाडा जि. पालघर

Updated : 19 Aug 2020 12:33 PM GMT
Next Story
Share it
Top