Home > महाराष्ट्र राज्य > कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर

कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर

कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर
X

जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त महिलांसाठी मार्गदर्शन

चंद्रपूर दि.23 ऑक्टोबर: कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेण्याची महिलांची सर्वसाधारण मानसिकता असते, मात्र त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे केवळ त्या महिलेचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाचीच हानी होते. म्हणूनच कर्करोग व इतर आजार टाळण्यासाठी महिलांनी स्वत:ची काळजी घेण्याची गरज अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी विषद केली. कर्करोग रूग्णाला समाजाने धीर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगीतले.

महिलांमध्ये स्तन कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन टाटा ट्रस्ट व चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिन्याचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कर्मचारी वृंदासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी, कर्करोगविषयक विशेष कार्यक्रमाप्रसंगी टाटा ट्रस्टचे जिल्हा प्रकल्प समन्वयक सुरज साळुंके, आशिष सुपासे, दंत चिकित्सक डॉ. तुषार रामटेके, टाटा ट्रस्टची चमू व जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर पुढे म्हणाल्या की, लवकर निदान व योग्य उपचारांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व नियमित तपासणी करून घ्यावी असा सल्ला दिला. तसेच टाटा ट्रस्ट मार्फत स्तन कर्करोग विषयक राबवित असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमामध्ये स्तन कर्करोगाविषयी माहिती सुरज साळुंखे यांनी दिली. तर स्तन कर्करोग काय आहे, त्याचे संभाव्य धोके, कर्करोगाची लक्षणे, स्तनाच्या कर्करोगाचे निदान तसेच स्वतःची स्तनपरीक्षा कशी करावी याची विस्तृत माहिती व सादरीकरणाद्वारे आदिती निमसरकार यांनी दिली.

Updated : 23 Oct 2020 2:28 PM GMT
Next Story
Share it
Top