Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > ऑनलाइन परीक्षांसाठी एमपीएससी प्रयत्नशील

ऑनलाइन परीक्षांसाठी एमपीएससी प्रयत्नशील

ऑनलाइन परीक्षांसाठी एमपीएससी प्रयत्नशील
X

प्रतिनिधी:जितेंद्रसिंग नाईक

येत्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आयोग प्रयत्नशील आहे. ऑनलाइन परीक्षांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येणार असून, या परीक्षांवर संपूर्णपणे आयोग नियंत्रण ठेवणार आहे.

ऑनलाइन परीक्षांसाठीची संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी एमपीएससीने निविदा प्रक्रिया राबवली आहे. प्रचलित पद्धतीनुसार एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा लेखी (ऑफलाइन) पद्धतीने घेतल्या जातात. मात्र तंत्रज्ञानामुळे होत असलेले बदल आत्मसात करून त्यानुसार कामकाजात बदल करण्याचा प्रयत्न एमपीएससीकडून करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच ऑनलाइन परीक्षांचे पाऊल टाकण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती आयोगाकडून केली जाणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षांवर संपूर्णपणे आयोगाचेच नियंत्रण असेल. मोठय़ा प्रमाणात उमेदवार असलेल्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार नाहीत. तसेच ऑनलाइन परीक्षा सायबर कॅफे मध्ये न होता आयोगाकडून परीक्षेसाठीची संस्था निवडली जाईल.

ऑनलाइन परीक्षेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख केली जाईल. त्यासाठीचा नियंत्रण कक्ष आयोगाच्या कार्यालयात असेल. आयोगाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीतच ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.

संगणकीय प्रणाली विकसित झाल्यानंतर छोटय़ा स्वरूपाच्या परीक्षांद्वारे ऑनलाइन प्रणालीची चाचणी घेतली जाणार आहे. या परीक्षेनंतर संगणकीय प्रणालीत काही बदल करण्याची गरज भासल्यास ते बदल करून त्यानंतर अन्य परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा आयोगाचा प्रयत्न असेल, असे आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले.

उमेदवारांच्या कृतींचे ‘प्रतिबिंब’

सध्याच्या प्रक्रियेनुसार उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिके च्या कार्बन प्रती दिल्या जातात. ऑनलाइन प्रक्रियेमध्येही ही व्यवस्था उपलब्ध असेल. त्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये ‘एक्झाम रिफ्लेक्शन अ‍ॅप्लिके शन’ची (प्रतिबिंब) सुविधा असेल.

या यंत्रणेतून परीक्षा सुरू झाल्यापासून उमेदवाराने सोडवलेली उत्तरे, परीक्षेदरम्यानच्या सर्व कृती परीक्षेनंतर उमेदवारांना त्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध होतील, असे निविदेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संगणकीय प्रणाली विकसित करणाऱ्या कंपनीकडून त्रुटी ठेवल्याचे आढळल्यास दंड आकारण्याचीही तरतूद निविदेमध्ये आहे.

Updated : 6 Aug 2020 8:37 AM GMT
Next Story
Share it
Top