Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > इथे मुसलमान म्हणतात "राम नाम सत्य है"- आ.कपिल पाटील यांचा लेख! | Here Muslims say "Ram naam satya hai" - MLA Kapil Patil's article!

इथे मुसलमान म्हणतात "राम नाम सत्य है"- आ.कपिल पाटील यांचा लेख! | Here Muslims say "Ram naam satya hai" - MLA Kapil Patil's article!

टिम म-मराठी न्युज नेटवर्क

(जाकीर हुसैन) : संपूर्ण देशाला अभिमान वाटावा असे कार्य हे मुसलमान करीत आहेत!

आवर्जून वाचवा असा हा आमदार कपिल पाटील यांचा लेख!

मरकजच्या नावाने किती बोंब मारली गेली. संशयाचं किटाळ तर आपल्या मनातही जमा झालं होतं.

दाढीवाल्यांच्या नावाने शिमगा करण्यात तर ते सराईतच आहेत.

अहमदाबादची ट्रम्प यात्रा मागे कोरोना ठेवून गेली, पण ते झाकण्यात आलं

पण कोविडग्रस्त हिंदू प्रेतांवर अंतिम संस्कार करायला कुटुंबातले धजत नव्हते, तेव्हा मुंबईतल्या प्रसिद्ध बडा कब्रस्थान मधले मुसलमान पुढे आले. एक नाही, दोन नाही 300 पेक्षा जास्त हिंदू प्रेतांवर त्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी शेवटचे संस्कार केले. अगदी हिंदू पद्धतीने. गळ्यात तुळशीची माळ घालून. व्यवस्थित तिरडी बांधून. चिता रचून. छिद्र असलेल्या मडक्यातून पाण्याची धार वाहत, प्रदक्षिणा घालत. नंतर पालिकेच्या प्रोटोकॉल नुसार विद्युत वाहिनीवर. भडाग्नी दिला. मंत्राग्नी दिला. मोबाईल वरून Whatsapp Video Call लावत सगळे अंतिम संस्कार त्यांच्या कुटुंबियांना दाखवले. अगदी काहींनी विनंती केली तर अस्थी विसर्जनही केलं. ज्यांनी मागितल्या त्यांच्या घरी अस्थी पोचवल्या. त्यासाठी एक पैसाही आकारला नाही. उलट भटजीला दान दक्षिणा दिली. 20 फुटांवरून भटजी सूचना देत होता. आणि नमाजी टोपीधारी मुसलमान हिंदू मंत्र बोलत शेवटचा अग्नी देत होते.

कुपर हॉस्पिटल मधील पहिलं हिंदू प्रेत घेऊन टिपिकल मुसलमानी पेहरावातील ते सहा जण ओशिवऱ्याच्या स्मशातभूमीत पहिल्यांदा पोचले तेव्हा, स्मशानातले कर्मचारी घाबरले होते. पण त्यांच्याकडे बाकायदा मृत्यूचं सर्टिफिकेट होतं. हॉस्पिटलचं पत्र होतं आणि कुटुंबियांचा व्हिडीओ मेसेज होता. स्मशानभूमीतले कर्मचारी तयार झाले. पहिल्या दिवशी त्या मुस्लिम कार्यकर्त्यांची नवागतासारखी अडचण जरूर झाली. पण माहिती घेत त्यांनी तो अंतिम संस्कार पार पाडला.

हिंदूंमध्ये सुद्धा एक प्रथा नाही, अनेक प्रथा आहेत. कुटुंबियांनी सांगितलं तसं प्रत्येक प्रथेचं पालन त्यांनी केलं. एका कुटुंबात तर मुलगीच होती. नातेवाईक कोणी यायला तयार नव्हते. इक्बाल ममदानी त्या मुलीला घेऊन बाणगंगेवर गेले. श्रीराम दंडकारण्यात असताना इथे येऊन गेल्याची कथा प्रचलित आहे. त्यांच्या बाणानेच इथे गंगा अवतरली अशी दंतकथा आहे. त्या बाणगंगेवर इक्बाल भाईंनी त्या मुलीच्या वडिलांचं अस्थी विसर्जन विधीवत केलं.

महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशात कानपूर जवळच्या एका गावात एक हिंदू म्हातारा गेला. तेव्हा त्याची प्रेत यात्रा खांद्यावर घेत आणि हातात अग्नीचं मडक घेत, राम नाम सत्य है चा जप करत मुसलमानांनी त्यांची अंत्ययात्रा काढली. कारण लॉकडाऊनमुळे त्यांचे कोणतेच नातेवाईक येऊ शकत नव्हते. गावात सगळे मुसलमान, एकच घर हिंदूंचं होतं. त्या घरातले सगळे दूर शहरात नोकरीला गेलेले. म्हाताऱ्याला शेजारचे मुसलमानच सांभाळत होते. पण अंतिम संस्कार कसा करायचा? हा प्रश्न होता. नातेवाईकांनी सांगितलं तुम्हीच करा. मुस्लिम तरुण जमले आणि त्यांनी पुढचे सोपस्कार पार पाडले. राम नाम सत्य है, असा त्यांचा ध्वनी त्या व्हिडीओत तुम्ही पाहिलाही असेल. पण राम नाम सत्य है, असा 300 प्रेतांच्या अंतिम संस्कारात तोच प्रतिध्वनी मुंबईत ऐकू येत होता. कारण जवळ असूनही कोरोनाग्रस्त प्रेताला हात कोण लावणार?

जळगावला एक शिक्षक कोरोनामुळे गेले. त्यांचे अंतिम संस्कार करायला, खांदा द्यायला कुणीही आलं नाही. सगळे लांबून पाहत होते. त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांचं प्रेत एकट्याने खांद्यावर नेलं. सरणावर कसं चढवलं असेल ते त्यालाच माहीत.

पण इक्बाल ममदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागे उभे राहिले ते बडा कब्रस्थानचे चेअरमन शोहेब खतीब. अनेकांसाठी तर त्यांनी कब्रस्थानची जागाच उपलब्ध करून दिली. हिंदूंचा अंतिम संस्कार करताना आपला धर्म बाटतो असा विचार सुद्धा त्यांना शिवला नाही. फक्त हिंदूंचीच नाही तर काही पारशी आणि ख्रिस्ती बांधवांच्या प्रेतांचीही त्यांनी त्यांच्या त्यांच्या धर्म संस्कारानुसार विल्हेवाट लावली. पारशी बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. ख्रिस्ती बांधवांचे रीतिरिवाज वेगळे. पण सगळेच सोपस्कार त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे खतीब आणि ममदानी यांच्या टीमने पार पाडले.

इक्बाल ममदानी सांगत होते, आम्ही मुस्लिम प्रेतांची विल्हेवाट लावत होतो. त्यांचा विधीवत दफनविधी करत होतो. तेव्हा लक्षात आलं शवागरात अनेक प्रेतं पडून आहेत. आम्ही डॉक्टरांना विचारलं. तर ते म्हणाले, ही हिंदूंची प्रेतं आहेत. कुणीच घ्यायला यायला तयार नाही. महापालिकेचा स्टाफही आता कमी पडतोय.

ममदानींनी त्यांना विचारलं, आम्ही हे केलं तर चालेल का? आम्ही त्यांच्या पद्धतीने करू. डॉक्टर म्हणाले, याहून काय चांगली गोष्ट आहे. फक्त रितसर परवानग्या काढू. मग तुम्ही हे करा.

त्या सगळ्या परवानग्या मिळाल्या नंतर एप्रिल, मे, जून आणि आता जुलै चार महिने अव्याहतपणे ही टीम काम करतेय. या टीममध्ये आहेत दोनशे तरुण. पण ज्यांनी सुरवात केली त्या पहिल्या सात जणांची नावं मला तर आवर्जून सांगितलीच पाहिजेत. बडा कब्रस्थानचे चेअरमन शोहेब खतीब, वरिष्ठ पत्रकार इक्बाल ममदानी, उद्योजक शाबीर निर्बन, अ‍ॅड. इरफान शेख, उद्योजक सलीम पारेख, उद्योजक सोहेल शेख, सामाजिक कार्यकर्ते रफिक सुरतीया. आजतागायत हे लोक त्याच कामात आहेत. सुरवातीला अडचण आली Ambulance ची, शववहिनीची. कोविडग्रस्तांसाठी नातेवाईक येत नाही तर Ambulance कुठून मिळणार. ममदानी आणि खतीब यांनी मग नादुरुस्त, पडून राहिलेल्या Ambulance शोधून काढल्या. त्या दुरुस्त केल्या. आता त्या अखंडपणे काम करताहेत. या कामासाठी बडा कब्रस्थान खतीब भाई, इक्बाल भाई आणि त्यांची सगळी टीम एक रुपया घेत नाहीत. सगळा खर्च ते स्वतः उभा करतात. काही दानशूरांनी त्यांना मदत केली आहे. पण नातेवाईकांकडून ते एक पैसा घेत नाहीत. लॉकडाऊनमुळे लोक आधीच आर्थिक संकटात आहेत. शेवटचा संस्कार करायला त्यांच्याकडे कसे पैसे मागायचे? असा इक्बाल भाईंचा सवाल आहे.

इक्बाल भाई, त्यांचे सहकारी आणि या कामात जोडले गेलेले 200 मुस्लिम तरुण आपल्या कुटुंबाची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांची गळाभेट घ्यावी, असं तुम्हालाही नक्कीच वाटत असेल.

देशात द्वेषाचा विखार पसरवणारे, हिंदू - मुसलमान हिंदू - मुसलमान करणारे, Whatsapp वरती घाणेरड्या भाषेत उद्धार करणारी जमात काही कमी नाही. आपल्या डोळ्यावरची आंधळी पट्टी कधी ते काढतील का? द्वेषानं भरलेलं पित्त कधी ओकून बाहेर फेकतील का? मोकळ्या मनाने कधी ममदानी, खतीब आणि त्यांच्या सहकाऱ्यांची गळा भेट घेतील का? या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी यावं ही भाबडी आशा असेल कदाचित. उम्मीद का सोडायची?

आमदार कपिल पाटील यांचा लेख.

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

Updated : 13 Sep 2020 3:50 PM GMT
Next Story
Share it
Top