Home > About Us... > शाहू महाराजांना मुस्लीम समाजातील शिक्षणप्रसाराची तळमळ

शाहू महाराजांना मुस्लीम समाजातील शिक्षणप्रसाराची तळमळ

Shahu Maharaj's desire to spread education in the Muslim community

शाहू महाराजांना मुस्लीम समाजातील शिक्षणप्रसाराची तळमळ
X

जाकीर हुसैन 9421302699

तत्कालीन समाजात एक ब्राह्मण सोडल्यास मराठा व इतर तत्सम जाती, लिंगायत, जैन, मुस्लीम अशा सर्वच जाती शेक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या होत्या आणि जोपर्यंत त्यांना शिक्षणाची गोडी लागत नाही तोपर्यंत त्या मागासलेल्याच राहणार अशी खंत शाहू महाराजांना होती. आणि म्हणूनच या विविध जातींत शिक्षणाविषयी जागृती व्हावी असी त्यांची खटपट होती. मुस्लीम समाजही शिक्षणा साठी पुढे यावा असे त्यांना वाटत होते.

१९०२ साली महाराज इंग्लंडच्या दौऱ्याहून सुखरूप परतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ कोल्हापुरातील मुस्लिमांनी एक समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे निमित्त साधून मुस्लीम पुढाऱ्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणा साठी जनजागृतीची चळवळ उभारावी, शैक्षणिक संस्था स्थापन कराव्यात, तसे केल्यास दरबारकडून त्यांना पूर्ण साहाय्य मिळेल, असे आश्वासन महाराजांनी दिले होते. पण तत्कालीन मुस्लीम समाजात शिक्षणाविषयी अनास्था इतकी पराकोटीची होती की, महाराजांनी त्यांच्या समोर उभा केलेल्या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा असे त्यांना वाटले नाही. मुस्लीम समाज थंडच राहिला. परंतु महाराज थंड बसले नाहीत. त्यांनी मुस्लीम समाजातील शिक्षणेच्छू १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात नुकत्याच स्थापन झालेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश देऊन संस्थानातील मुस्लिमांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. उपरोक्त दहा विद्यार्थ्यांत कर्नाटकातील अथणी गावचा शेख महंमद युनूस अब्दुल्ला हा एक विद्यार्थी होता.हा पुढे राजाराम कॉलेज मधून ग्रॅज्युएट झाल्यावर त्यास महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. मुस्लीम समाजात शिक्षणाची गोडी लावण्याचे कामही त्याच्या वर सोपवले गेले.दरम्यान १९०६ साली शाहू महाराजांनी आपण हून पुढाकार घेऊन मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावली व मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली; स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष बनले. आणि युसूफ अब्दुल्लांना कार्यवाह बनवले, हा निर्देश यापूर्वी येऊन गेलाच आहे. विशेष म्हणजे

महाराजांनी संस्थानातील नानाविध जाति- धर्माच्या लोकांना त्यांच्या समाजातील शिक्षण प्रसारासाठी विद्यार्थ्यांची वसतिगृहे स्थापन करण्यास उद्युक्त केले होते व भरघोस साहाय्यही दिले होते पण कोणाही वसतिगृह-संस्थेचे ते पदाधिकारी बनले नव्हते. मुस्लीम समाजाबद्दल मात्र त्यांनी अपवाद केला. त्यांच्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. ही बाब त्यांच्या मुस्लीम समाजा संबंधीच्या आस्थेची द्योतक होती. त्या समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन त्यांचा मागासले पणा जावा म्हणून महाराजांची ही सर्व खटपट चालू होती.

शेवटी त्यास यश येऊन मुस्लीम बोर्डिंग सुरू करण्यात आले. संस्थानातील मुस्लीम देवस्थानांची उत्पन्ने या बोर्डिंगच्या संस्थेला जोडण्यात आली. असाच देवस्थानचे उत्पन्न संस्थेला देणारा महाराजांचा एक हुकूम उपलब्ध आहे. त्यात ते म्हणतात, कोल्हापुरात मागासलेल्या लोकांची बोर्डिंग स्थापन झाली आहेत. मुसलमानांच्या बोर्डिंग शिवाय इतर जातींची बोर्डिंग चांगले प्रकारे चालली आहेत. मुसलमान बोर्डिंगांची सांपत्तिक स्थिती चांगली नाही. इतर जातीप्रमाणे मुसलमान लोक सुशिक्षित होणे इष्ट आहे. त्यांचे संस्थेस पैशाची सोय झाल्या शिवाय त्यांची स्थिती सुधारेल असे वाटत नाही. सबब कसबा रुकडी, पेटा, हातकणंगले येथे श्री हजरत पिराचे प्रस्था करिता, दर्ग्याचे रिपेरींगकरिता बगेरे ५०० रु. (पाचशे रुपये) ठेवून घेऊन बाकीची सर्व रक्कम 'सेक्रेटरी टू दि किंग एढवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर' याजकडे दरसाल पाठविणे मंजूर केले आहे. सदरची रक्कम सोसायटीचे नियमाप्रमाणे खर्च होण्याची आहे.

--------------------

संकलन अताउल्ला पठाण सर

Updated : 26 Jun 2021 9:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top