Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > अंधश्रद्धेचे लॉक डाऊन होणार तरी कधी ?

अंधश्रद्धेचे लॉक डाऊन होणार तरी कधी ?

अंधश्रद्धेचे लॉक डाऊन होणार तरी कधी ?
X

मेळघाटमध्ये सात महिन्याच्या बाळाच्या पोटावर गरम सळीचे शंभर चटके देण्यात आले. या बातमीची शाई वाळते न वाळते तोच दुसऱ्याच दिवशी २६ दिवसाच्या बाळाच्या पोटावरती गरम चटके देण्यात आले. याआधी देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत. यामधील व्यक्ती, प्रसंग, स्थळ वेगवेगळे असले तरी यामध्ये एक समान सूत्र आहे, ते म्हणजे हे सर्व प्रकार अंधश्रद्धेतून घडले आहेत. आज आपण २१ व्या शतकात वावरतोय. माणूस चंद्रावर गेला, मंगळावर वसती करण्याची स्वप्न पाहू लागला, त्याच देशात एका बाजूला विज्ञान म्हणजे काय हे माहित नसलेला खूप मोठा वर्ग आहे. पण त्याची कारणेही अनेक आहेत. यांच्या रोजच्या खाण्यापिण्याचे, जगण्याचे प्रश्न इतके मोठे आहेत की, त्यांना इतर कशाचा विचार करायला वेळच नाही. आजदेखील आजारपणात रुग्णाला डॉक्टरकडे नेण्यापेक्षा भगताकडे नेण्याकडे त्यांचा कल जास्त आहे . मंत्र तंत्र, जादूटोणा,करणी यावर या लोकांचा प्रचंड विश्वास आहे. साधे, भोळे भाबडे, जिवाला जिव देणारे लोक, अंधश्रद्धे पायी कुणाचा जीव घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत. अनेक जिवाभावाच्या नात्यांचा या अंधश्रद्धेसमोर टिकाव लागत नाही, हे भीषण वास्तव आहे.

मेळघाटमध्ये सात महिन्याच्या आणि सव्वीस दिवसाच्या बाळाच्या पोटावरती जे गरम सळीचे चटके देण्यात आले त्यामागे या लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा हे खूप मोठे कारण आहे. पोटदुखीसारख्या आजारावर उपचार म्हणून अतिदुर्गम मेळघाटात डंबा ही उपचारपद्धती वापरली जाते, यात हा प्रकार केला जातो.मेळघाटातील शेवटच्या घटकापर्यंत पुरेशी आरोग्य व्यवस्था न पोहोचू शकल्याने डंबा ह्या उपचारपद्धतीचा वापर आता नित्याचाच झाला आहे. अतिशय क्रुर आणि जिवघेणा असा हा प्रकार आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की , पोटच्या पोराच्या पोटावर मांत्रिक डागण्या देत असताना, त्या बाळा इतकीच आई कळवळली नसेल का ? पण या अघोरी उपायाने आपलं बाळ बरं होईल ही तिची अंधश्रद्धा तिला हा उपाय करण्यास बाध्य करते. तेव्हा अंधश्रद्धेचा प्रभाव हा कुठल्याही नात्यापेक्षा वरचढ ठरतो हेच दृष्टीस येते.

२०१३मध्ये ' महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा ' संमत झाला. अतिशय क्रांतिकारी असा हा कायदा आहे. या कायद्याचे पूर्ण नाव ' महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ ' असे आहे. हा कायदा संमत झाल्यापासून अंधश्रद्धेबाबतच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाली, काही गुन्ह्यांची यशस्वीपणे उकल करण्यात येऊन आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली, तर अनेक गुन्हे होण्या आधीच रोखता आले. दोन -तीन केसेसचा इथे उल्लेख करावासा वाटतो. यवतमाळ जिल्हयातील, घाटंजी तालुक्यातील, चोरांबा या गावच्या सपना पळसकर नरबळी प्रकरणाची बरीच चर्चा झाली. जवळपास सात महिने पोलिसांना गुन्ह्याची उकल होत नव्हती. जेव्हा या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेलेत कारण हा नरबळी सपनाचे सख्खे आजोबा ( आईचे वडील ) आजी ( आईची आई )आणि मामा यांनी दिला होता. त्यांचे हे क्रौर्य अतिशय घृणास्पद, किळसवाणे आणि अंगावर शहारे आणणारे होते. गावातील दुर्गाबाई शिरभाते नावाच्या बाईच्या अंगात देवी यायची. या दुर्गाबाईच्या स्वप्नात देवी आली, तिने संकट निवारणाचा मार्ग म्हणून नरबळी देण्याचा उपाय सांगितला आणि सख्ख्या आजोबा , आजी आणि मामांनी आपल्याच घरातील मुलीचा -सपनाचा देवीसमोर बळी दिला. सपनाचा गळा चिरल्यानंतर मांत्रिक आणि बाकी सर्वच लोकांनी सपनाचे रक्त देवीवर शिंपडल्यानंतर स्वत: प्रसाद म्हणून प्राशन केले.केवढे हे क्रौर्य ! पोलिसांनी दुर्गाबाईला पकडल्यानंतरही ही बाई पोलिसांना आव्हान करून म्हणत होती, ' तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही कारण देवी माझ्या पाठीशी आहे. ' घरच्या मुलीचा बळी देऊनही या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा मागमूसही नव्हता. यात दिलासादायक बाब एवढीच आहे की, यातील सर्व आरोपींना यवतमाळ सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

वर्ध्याच्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणातील क्रौर्य असेच भीषण ! एका रिक्शा चालकाने सिद्धी प्राप्त करण्याच्या हेतूने रुपेश मुळे याचा बळी दिला. त्याची किडणी, डोळे, लिंग भाजून खाल्ले. अंधश्रद्धाळू माणूस कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही करवत नाही. त्यानंतर चंद्रपूरच्या युग मेश्राम नावाच्या लहानग्या मुलाचा बळी देण्यात आला. हा नरबळी युगच्या घराशेजारी राहणाऱ्या माणसानेच दिला. डोक्यावर तीन भोवरे असणाऱ्या मुलाचा बळी दिल्याने गुप्त धन प्राप्त होते , असे मांत्रिकाने सांगितल्यामुळे युगचा जीव घेण्यात आला. लहान लहान, निरपराध मुलांचा काहीही दोष नसताना केवळ अंधश्रद्धेपाई जीव घेतला गेला. मागे एक व्हिडिओ आला होता. एका तरुणीला मांत्रिक शेणाचे लहान लहान गोळे खाऊ घालत होता. तरूणीचे हातपाय तिच्या आई - वडिलांनी घट्ट पकडलेले होते. बघ्यांची बरीच गर्दी होती. मुलीला ते शेणाचे गोळे गिळणे असहनीय होत होते. पण जबरदस्तीने एकामागे एक गोळे मांत्रिक तिच्या तोंडात घालत होता. इतक्या गर्दीतही असहाय्य अशा त्या तरूणीचा तो व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटले.

मेळघाटमध्ये आजही जनमानसावर अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा आहे. विज्ञानाची उच्च पदव्या घेणारे अजून अंधश्रद्धेतून बाहेर पडू शकलेले नाहीत,तिथे अशिक्षित लोकांकडून काय अपेक्षा करणार ! दारिद्रय, दु:ख, दैन्य, अज्ञान ज्यांच्या पाचवीलाच पुजलंय, तिथे अशा घटना घडणे नाविन्यपूर्ण नाहीच. काहीच घटना फक्त उघड होतात. कधी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी नरबळी दिला जातो. कधी करणी केल्याच्या संशयावरून जीव घेतल्या जातो. कर्नाटकी , जादूटोणा करणारी स्त्री म्हणून एखादीची नग्न धिंड काढली जाते.एखाद्याला भूत लागले म्हणून मांत्रिकाला बोलवून बेदम मारहाण केली जाते. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केलेला असताना, अंधश्रद्धेच्या अशा घटना माणसाचे जिणेच हिरावून घेतात. या समाजातच आपण देखील राहतो. असे अनेक अंधश्रद्ध लोक आपल्याही आजूबाजूला असतील. तेव्हा सावधान ! या दुष्टचक्राने आपल्या घराचा वेध घेऊ नये म्हणजे झाले.

डाॅ.स्वप्ना लांडे

मो.7507581148

Updated : 26 July 2020 6:22 PM GMT
Next Story
Share it
Top